जळगाव मिरर | १८ मार्च २०२५
गेल्या तीन ते चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा तापला असल्याने अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या आगीच्या घटना घडत असून आज दि.१८ मार्च रोजी जळगाव शहरातील टॉवर चौकातील एका इमारतीला सायंकाळी अचानक भीषण आग लागली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. लागलीच घटनास्थळी अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि एका अग्निशामक बंबाच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू केले. या आगीत अडकलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेमुळे स्थानक परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मोठ्या संख्येने लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, ज्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. प्रशासनाने नागरिकांना शांतता पाळण्याचे व गरज नसताना घटनास्थळी जमाव न करण्याचे आवाहन केले आहे. आगीमुळे किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज अजून स्पष्ट झालेला नाही.




















