जळगाव मिरर | २४ मार्च २०२५
गेल्या काही दिवसापासुन अपघातासह शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे एका शेतकऱ्याचा गहू फिल्टर करण्याच्या मशीन मध्ये डोके अडकून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२४) घडली. बाळू सोमनाथ वाकचौरे (वय २८, रा. भेंडाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ च्या सुमारास जालिंदर म्हस्के यांच्या वस्तीवर बाळू वाकचौरे हे गहु फिल्टरच्या मशीनमध्ये गहू टाकण्याचे काम करत असताना गव्हाची गोणी फिल्टरमध्ये टाकत असताना अचानक त्यांचा हात गोणीत अडकून मशीनमध्ये गेला आणि त्यानंतर पूर्ण शरीर मशीनने ओढले. या भीषण अपघातात त्यांचे शीर धडावेगळे होऊन मशीनमध्ये अडकले होते. मशीन खोलून शीर बाहेर काढावे लागले.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर त्यांचे पार्थिव गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. बाळू वाकचौरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा, मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अनिल झोरे करीत आहेत.




















