जळगाव मिरर | २८ मार्च २०२५
नूतनवर्षा कॉलनीतील एका अपार्टमेंटच्या जिन्याखाली ठेवलेल्या ४० हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या कार व दुचाकी आणून चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी रामानंदनगर पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यानुसार रामानंदनगर पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. हे चारही तरुण उच्च शिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली कार जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नूतनवर्षा कॉलनी येथे गोविंद विष्णू मराठे यांचे चार मजली अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या जिन्याखाली तीन इन्व्हर्टर बॅटरी ठेवल्या आहेत. ९ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या चोरट्यांनी जिन्या खालच्या सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून एक १९ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली. त्यानंतर पुन्हा सहा दिवसांनी १५ तारखेला हेच चोरटे दुचाकीने अपार्टमेंटमध्ये आले. त्यांनी पुन्हा तेथून २१ हजार रुपये किमतीची बॅटरी लांबवली. ही घटना मराठे यांच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले चोरटे दिसून आले.
ही बाब त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय, गुरुवारी मराठे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चौघांनी चोरीच्या गुन्ह्यासाठी वापरलेली कार ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या चार पैकी एक तरुण हा पोलिसाचा नातू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एकाने कार ही लग्नाच्या कार्यक्रमासाठी हवी असल्याचे सांगून आणली असल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.