
जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२५
गेल्या काही वर्षापासून राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना नेहमीच वाढ होत असतांना त्यात एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. यावेळी या तरुणीने विनयभंग करणाऱ्या मुलाला चांगलाच धडा शिकवला आहे. यावरून तिच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच तिने केलेल्या कृतीचे सर्वांनी स्वागत केले आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसी सुरवसे ही इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असून तिला हजारो फॉलोअर्स पण आहेत. नुकतेच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती इमारतीच्या जिन्यावर उभी राहून शूट करत होती. यावेळी लाल रंगाचा टॉप आणि पांढरा स्कर्ट घातलेला होता. शूट सुरू करताना तिथून एक मुलगा वर जात असताना मानसीच्या जवळून जात तिला स्पर्श केला. यावेळी मानसीने त्याचा हात पकडला आणि थेट कानफडात लगावली. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये शूट झाली असून मानसीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्या मुलाचा हात पकडून मानसीने त्याला चांगलेच खडसावले. तू जे काही केले आहे ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले आहे, असे मानसी त्याला म्हणते. त्यानंतर मुलगा सॉरी म्हणत वरच्या मजल्यावर जातो. मानसीने केलेल्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केले आहे. तसेच अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे वाटत आहे. या व्हिडिओसोबत मानसी सुरवसेने एक कॅप्शनही लिहिले आहे.
मानसीने हा व्हिडिओ त्या मुलाच्या घरच्यांना दाखवला. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी तो मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले. मानसिक आरोग्याची समस्या असेल तर तो काहीही करणार का? असा सवाल मानसीने केला आहे. घडलेल्या संपूर्ण घटनेविषयी मानसीने सांगितले की, मी सहजपणे व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. हा मुलगा माझ्या इमारतीतच राहतो आणि त्याने अशा प्रकारचे वर्तन केले. जेव्हा आम्ही व्हिडीओचा पुरावा घेऊन त्याच्या घरी गेलो, तेव्हा त्याच्या घरच्यांनी सांगितले की याची मानसिक स्थिती ठीक नाही! याच्या डोक्यात काहीतरी समस्या आहे. म्हणून तो काहीही करेल, खरंच? कोणत्या अँगलने हा मानसिक रुग्ण दिसत आहे? लोक कपड्यांवरून जज करतात. मी तर व्यवस्थित कपडे घातले होते, तरीही हे सर्व घडले? हे योग्य आहे का? अशा लोकांचा धिक्कार असो! त्या समाजावर धिक्कार असो जो कपड्यांवरून लोकांना जज करतो. मला 10000 टक्के खात्री आहे की जर मी त्या वेळी साडी किंवा कुर्ता घातला असता तरी हेच झाले असते.