
जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२५
दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत डॉ. शरयु विसपुते यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांनी ‘सिनियर बी’ गटात पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांमध्ये इतर २१ आशियाई देशांतील स्पर्धकांना मागे टाकत हे यश संपादन केले.
डॉ. शरयू विसपुते यांनी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या उत्कृष्ट योगासन कौशल्याचे प्रदर्शन करत निर्णायक विजय मिळवला. त्यांनी पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांच्या प्रकारात अद्वितीय प्राविण्य दाखविले. त्यांच्या अचूक मुद्रा, लयबद्ध हालचाली आणि योगासनांवरील प्रभुत्व यामुळे त्यांना प्रतिस्पर्धकांवर सहजपणे मात करता आली.
या स्पर्धेत आशियातील एकूण २१ देशांतील योग साधकांनी सहभाग घेतला होता. डॉ. शरयू यांनी आपल्या वयोगटातील ‘सिनियर बी’ गटात कडवी झुंज देत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय योगासनांची श्रेष्ठता सिद्ध केली आहे. डॉ. शरयू विसपूते यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि योगासनांवरील निष्ठेचे हे फळ आहे. या विजयामुळे भारतीय योगसाधकांना एक नवी ऊर्जा मिळाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.
डॉ. शरयू विस्पुते यांनी यापूर्वीही अनेक योगासन स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यासोबतच त्यांनी राज्यातील इतर योग स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या त्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत असून, आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्या योगासनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.