
जळगाव मिरर | ६ मे २०२५
दिवसभर दुकानात झालेल्या व्यावसायाचे पैसे दुकानातील बिले, चाव्यांसह दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्या होत्या. त्याठिकाणी पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी पैशांच्या बॅगसह सर्व वस्तू चोरुन नेल्या. ही घटना दि. ३ रोजी रात्रीच्या सुमारास दाणाबाजार परिसरातील पोलनपेठ परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीतील समाधा नगरातील रहिवासी असलेले विक्की लक्ष्मणदास वालेचा (वय ३८) यांचे शहरातील दाणा बाजारातील दत्त मंदिराच्या मागे पोलनपेठेत धान्याचे दुकान आहे. दि. ३ मे रोजी रात्री त्यांनी दिवसभरातील व्यवसायाचे रोख ९० हजार रुपये, धान्याची बिलं, एमआयडीसीतील गोदामाच्या चाव्या एका पिशवीत ठेवून ती पिशवी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. तसेच दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप पुन्हा एकदा तपासत असतानाच एक चोरटा त्यांच्या दुचाकीजवळ आला, त्याने दुचाकीच्या डिक्कीतील पिशवी चोरून तो दुसऱ्या दुचाकीवरुन तेथून पसार झाला. दुकान बंद करण्यासाठी दुकानाबाहेर आलेल्या विक्की वालेचा यांनी डिक्कीत पैशांची पिशवी ठेवल्यानंतर एक जण चालत दुचाकीजवळ आला. त्याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पिशवी काढली. बाजूला एक जण दुचाकी घेऊन उभाच होता, त्यावर चोरटा बसला व तो पळून गेला. डिक्कीतून पिशवी काढणारा चोरटा हा दुचाकीवर थांबलेल्या आपल्या साथीदारासोबत बोलून त्याला माहिती देत होता.
दाणाबाजारातून पैशांची बॅग चोरल्यानंतर चोरटे दुचाकीवरून फळ गल्ली, शहर पोलिस ठाण्यासमोरून टॉवर चौक व तेथून चित्रा चौकाकडे गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती विक्की वालेचा यांनी दिली. या प्रकरणी विक्की वालेचा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.