जळगाव : प्रतिनिधी
शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या शिवाजीनगर हुडकोतील तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीचे युसूफ शेख ऊर्फ चिल्या इसा शेख रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव असे नाव आहे.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरटयाचा शोध घेवून त्यास अटक करण्याच्या सुचना व आदेश दिले होते. शिवाजीनगर हुडकोतील संशयित युसूफ शेख ऊर्फ चिल्या हा मोबाईल चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, राहूल पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या. पथकाने शिवाजीनगर भागातून माहिती काढून संशयित युसुफ शेख यास अटक केली. दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मोबाईल चोरीच्या गुन्हयाची संशयित युसूफ शेख याने कबूली दिली आहे. त्याच्याकडून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.





















