जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद जवळ असलेल्या तिघ्रे गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ८८५ किलो ओला गांजा हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तिघ्रे गावातील एका घरात ओला गांजा असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार नशिबराबाद भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ४ जुलै रोजी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत सुमारे ८८५ किला वजनाचा गांजा जप्त करण्यात यश आले आहे. पहाटे पासूनच या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. हि कारवाई अतिशय गुप्त पद्धतीने होत असल्यामुळं येथील नागरिकांना सुद्धा काही वेळ समजले नाही कि नेमकी हि धाड कशासाठी टाकली गेली आहे.
मंगळवारी ५ जुलै रोजी पथक तिघ्रे गावात थांबून होते. पंचनामा करण्यात आला असून रात्री उशीरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलीसांचा सुगावा लागल्यानंतर काही संशयित आरोपी हे पसार झाले असून एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या कारवाईमुळे अवैधरीत्या गांजा तस्करी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.




















