
जळगाव मिरर | २७ मे २०२५
राज्यातील अनेक भाविक नाशिक येथून जवळ असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात असतात, आता याच गडावर जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला अपघात होऊन १४ भाविक जखमी झाले. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गडावर दर्शनास जात असतांना पिकअप वाहन पलटी झाले. यामध्ये १४ जखमी झाले असून त्यात तीन लहान बालकांचा समावेश आहे.
सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला मंगळवारी (दि.27) रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास अपघात होऊन १४ भाविक जखमी झाले असून, त्यामध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे.
सटाणा तालुक्यातील दोदेश्वर परिसरातील कोळीपाडा येथून एकूण २५ भाविक सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी जात होते. वणी-सप्तशृंग मार्गावर पिकअप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुमारे १५ फुट खोल चारीत कोसळली.
सोनाबाई जाधव (३५), सुनिता लवारे, सीमा कावळे (२५), शिवानी गायकवाड (७), शिवानी पवार (७), वर्षा गायकवाड (२३), शितल गायकवाड (४०), ज्ञानदा पवार (३८), अभिजीत गायकवाड (४), शंकर गायकवाड (२३), ज्योती गायकवाड (१७), दत्ताबाई पवार (३०), शुभम गातवे (२५), यश घोडे (१९).
सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली गायधनी, डॉ. राहुल पटाईत, तसेच खाजगी डॉक्टर डॉ. अनिल शेळके, डॉ. विराम ठाकरे, डॉ. सोहम चांडोळे यांनी तात्काळ उपचार सुरू केले. यातील तीन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वणी ग्रामीण रुग्णालय हे गुजरात सीमेवर असलेल्या अर्धे शक्तिपीठ सप्तशृंग गडाच्या जवळ असून, या भागात वारंवार अपघात होतात. त्यामुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या मंजूर झालेले उपजिल्हा रुग्णालय दिंडोरी येथे असले तरी, तेथून नाशिक जिल्हा रुग्णालय फक्त २५ किमी अंतरावर असल्याने बहुतांश रुग्ण थेट नाशिकलाच रवाना होतात. अशा परिस्थितीत वणीमध्येच उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची गरज स्थानिकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे.