जळगाव मिरर | ८ जुलै २०२५
राज्यातील मीराभाईंदर येथे हिंदी भाषित व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या मुद्यावरून मारहाण केली होती. या मारहाणीच्या विरोधात मीरा-भाईंदर मधील व्यापारी संघटनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढला होता. या मोर्चाला उत्तर देण्यासाठीच मीरा-भाईंदर मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार आहे. मात्र त्या आधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. काशिमीरा पोलिसांनी अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले. मात्र, दुसरीकडे मनसे नेते गनिमी कावा पद्धतीने हा मोर्चा काढणारच असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मनसेच्या वतीने हिंदी भाषित व्यापारी विरुद्ध काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरी देखील आम्ही मोर्चा काढणार असल्याचे मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यात अविनाश जाधव यांचा देखील समावेश आहे. त्यांना पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबरोबरच अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल ट्रॅक करून त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.
मनसेच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असला तरी देखील आम्ही गनिमी कावा करुन हा मोर्चा काढणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे. मनसेचे काही पदाधिकारी गनिमी कावा पद्धतीने हा मोर्चा काढण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आज मीरा- भाईंदर परिसरामध्ये वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
