जळगाव मिरर | ९ जुलै २०२५
मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली झोकून देत दीपक अरुण पाटील (वय ४८, रा. रामचंद्रनगर, अयोध्या नगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री बारा वाजेपुर्वी असोदा ते पाळधी दरम्यान अपलाईनवर घडली. घटनास्थळावर लावलेल्या दुचाकीवरुन त्यांची ओळख पटविण्यात आली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अयोध्या नगरातील रामचंद्र नगरात दीपक पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते, एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. सोमवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास दीपक पाटील हे दुचाकीने असोदा रेल्वे गेट परिसरात आले. त्यांनी अपलाईनवरील खांबा क्रमांक १२२/६ दरम्यान, धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली.
त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुचाकीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी माहिती काढून त्यावर दिलेल्या क्रमांकावरुन दीपक पाटील यांच्या नातेवाईकांची संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती देत त्यांची ओळख पटवली.
