जळगाव मिरर | १० जुलै २०२५
आपल्या महावितरण विभागामार्फत ग्राहकांना वेळोवेळी विविध कारणांसाठी जसे की, वीजबिल भरण्याची तारीख, थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चेतावणी, देखभाल-दुरुस्तीमुळे होणारी वीज खंडित सेवा इ. मोबाईलवर एसएमएस पाठविले जातात. मात्र, हे सर्व मेसेज इंग्रजी भाषेत असतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक असून, त्यांना इंग्रजी भाषेतील संदेश समजणे कठीण जाते. परिणामी अनेक वेळा ग्राहकांना योग्य वेळी महत्त्वाची माहिती मिळत नाही, त्यामुळे गैरसमज, त्रास व मानसिक तणाव निर्माण होतो.
महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट आदेश आहे की, शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाची भाषा मराठी असावी. महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा संवर्धन व वापर वाढीसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आहेत. त्यानुसार महावितरणसारख्या सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या खात्याने आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे अपेक्षित आहे.
अतः आमची मागणी आहे की, महावितरण विभागामार्फत ग्राहकांना मोबाईलवर पाठविले जाणारे सर्व प्रकारचे मेसेज (बिल भरण्याची तारीख, वीज कापणीची सूचना, सेवा खंडित इ.) मराठी भाषेत पाठवले जावेत. ह्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना संदेश समजणे सोपे जाईल व विभागावरचा विश्वास अधिक दृढ होईल. ही मागणी अतिशय महत्वाची असून, आपण यास सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, ॲड सागर शिंपी, दीपक राठोड, प्रदीप पाटील, राजेंद्र बाविस्कर, महिला सेना अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, विकास पाथरे, किशोर खलसे
