जळगाव मिरर | १० जुलै २०२५
देशातील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आणि महाराष्ट्राच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका केली जात होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून माघार घेतल्याचे दिसत आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठी आणि महाराष्ट्राचे योगदान फार मोठे असून देशाच्या इकॉनमीमध्ये देखील जास्त योगदान असल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.
निशिकांत दुबे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात मराठीचे योगदान खूप मोठे आहे. जसा मराठी भाषेचा सन्मान आहे, तसाच कन्नड भाषेचा आहे, तमिळ भाषेचा आहे. जशी यांची मूळ भाषा आहे, तशीच उत्तर भारतीयांची भाषा आहे. उत्तर प्रदेशातले लोक असतील, मध्य प्रदेशचे लोक असतील, झारखंडचे लोक असतील, त्यांची पण एक भाषा आहे. भाषेच्या मुद्द्यावरून जर ठाकरे कुटुंब मारहाण करत असेल तर हे आमच्या सहनशक्तीच्या बाहेर आहे.
पुढे बोलताना निशिकांत दुबे म्हणाले, मी जे काही वक्तव्य केले होते, त्याला तोडून अर्धवट दाखवण्यात आले होते. महाराष्ट्राचे या देशाच्या आर्थिक स्थितीत मोठे योगदान आहे. हे कोणी नाकारत नाही. मी जे म्हटले त्याला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. मी जे म्हणत आहे की महाराष्ट्रात जे काही टॅक्स भरावा लागतो, त्यात आमचे सुद्धा योगदान आहे. याचा ठाकरे कुटुंबाशी संबंध नाही, मराठी माणसाशी संबंध नाही.
निशिकांत दुबे म्हणाले, स्टेट बँक ऑफ इंडिया टॅक्स भरते कारण त्याचे मुख्य कार्यालय तिथे आहे. सिक्कीमचे लोक सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे टाकतात. एलआयसीचे ऑफिस कुठे आहे, मुंबईत. दुसरी गोष्ट अशी आहे की गरिबांना मारहाण केली जाते. इथे मुकेश अंबानी राहतात, मराठी तर फार कमी बोलतात. हिंमत असेल तर त्यांच्याकडे जा. माहीममध्ये सगळे मुस्लिम आहेत, हिंमत असेल तर तिथे जा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन मराठी नाही बोलत, ते तर तेलगू बोलतात, त्यांना मारहाण करून बघा. माझे हे म्हणणे आहे की तुम्ही गरिबांना का मारतात? इथे ते कमवायला आले आहेत आणि त्यांचे महाराष्ट्राच्या इकॉनमीमध्ये योगदान आहे.
मी खासदार आहे, मला माहीत आहे काय करायचे आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जर असे वाटत असेल की परप्रांतीय लोकांना धमकावून, मारहाण करून असे वातावरण निर्माण करून राजकारण करायचे असेल तर हे योग्य नाही. तुम्ही इतर राज्यात गेलात तर तुम्हाला तिथले लोक सुद्धा मारतील, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.
