जळगाव मिरर | १० जुलै २०२५
पावसाळा सुरू झाला की निसर्ग बहरतो, वातावरणात गारवा निर्माण होतो आणि एक नवा उत्साह सगळीकडे पसरतो. मात्र, या ऋतूचे हवामान दमट असल्यामुळे अनेक प्रकारचे जंतू, बुरशी आणि संसर्गजन्य रोग सक्रिय होतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन हे फारच महत्त्वाचे ठरते. योग्य आहारच आपल्याला पावसाळ्यात निरोगी ठेवू शकतो.
पावसाळ्यात काय खाणे योग्य आहे?
- उकडलेले व शिजवलेले अन्न:
या ऋतूत कच्च्या पदार्थांऐवजी उकडलेले किंवा शिजवलेले अन्न खाणे अधिक सुरक्षित असते. उकडल्याने जंतू नष्ट होतात व पचनास मदत होते.
- उपवासाचे पदार्थ – हलके व सात्त्विक:
साबुदाणा, भाताची खिचडी, फळे व ताक यासारखे पदार्थ उपयुक्त ठरतात. हे पचनास हलके व शरीरासाठी उर्जादायक असतात.
- हळद, आले, तुळस युक्त पदार्थ:
हे घटक नैसर्गिक प्रतिजैविक (antibacterial) असून रोगप्रतिकार वाढवतात. आल्याचा काढा, हळदीचे दूध यांचा नियमित वापर करावा.
- सूप व गरम पेये:
टोमॅटो सूप, पालक सूप, लिंबूपाणी, साजूक तूप मिसळलेले गरम दूध – हे शरीर गरम ठेवतात आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतात.
- कोरडे व ताजे पदार्थ:
अतिजास्त तेलकट, पाणथळ व फ्रीजमधील पदार्थ टाळा. त्याऐवजी कोरड्या भाज्या, फुलका, डाळ-भात ही योग्य पर्याय आहेत.
- हंगामी फळांचा समावेश:
संत्रं, पेरू, सफरचंद, डाळिंब, सीताफळ अशा फळांमध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
- दही ऐवजी ताक:
पावसाळ्यात दही थंड असते व कफ वाढवते. याऐवजी ताक घेणे अधिक योग्य ठरते.
पावसाळ्यात काय टाळावे?
- तळलेले व तेलकट पदार्थ (समोसा, भजी, वडे) – हे अपचन व अॅसिडिटी वाढवतात.
- उघड्यावरचे फास्ट फूड – संसर्गाचा धोका अधिक.
- फ्रिजमधले कालबाह्य अन्न – बुरशीजन्य संसर्गाची शक्यता.
- कच्ची फळे व भाज्या – जर नीट धुतले नाहीत, तर पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
- थंड पेये व बर्फ – घसा दुखणे, सर्दी यांना आमंत्रण.
