जळगाव मिरर | १२ जुलै २०२५
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
१५ जुलै मंगळवारी शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर पायउतार होण्याची इच्छा जयंत पाटील यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे असणार असल्याची माहिती माध्यमांतून समोर आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये भाकरी फिरवली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाचा वाद चिघळला होता. त्यात मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी रोहित पवार किंवा रोहित पाटील यांना संधी द्या, अशी मागणी करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वसर्वा शरद पवार यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी पदापासून मुक्त करण्याचे विधान केले होते. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. आज सात वर्षाचा कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे विधान त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावर अनेक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला होता.
