जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या हॉटेल रॉयल पॅलेसवर टाकलेल्या धाडीनंतर आठ उद्योजकांना तीन पत्ती जुगार खेळताना रंगेहाथ पकडल्यावर, ही केवळ जुगाराची कारवाई न राहता, हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर, हॉटेल प्रशासनाकडून असा कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही की, त्यांनी अशा प्रकारास विरोध केला होता. त्यामुळेच हॉटेल व्यवस्थापनाने याला मूक संमती दिली होती का? किंवा व्यवस्थापन यामध्ये थेट सहभागी होते का? असा प्रश्न आता जळगाव शहरात उपस्थित होत आहे.
कायदेशीरदृष्ट्या एकाच खोलीत आठ जण?
हॉटेलमध्ये नियमांनुसार एका खोलीसाठी २ ते ३ जणांपर्यंत परवानगी असते. मात्र या प्रकरणात एका खोलीत आठ जण आढळून आले. यामुळे हॉटेल प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करून मोठी जबाबदारी झटकली आहे का? याची चौकशी आता स्थानिक प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे.
मोठ्या व्यक्तींचा ‘मुक्काम’ आता संशयाच्या भोवऱ्यात?
हॉटेल रॉयल पॅलेस हे जळगावमधील लक्झरी आणि हायप्रोफाईल हॉटेल म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि व्यावसायिक येथे मुक्कामी राहत असत. अशा ठिकाणी जुगाराचा प्रकार उघडकीस आल्याने, या प्रतिष्ठित व्यक्तींनाही आता सावध राहावे लागणार आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
