जळगाव मिरर | ३१ जुलै २०२५
अमळनेर शहरातील शहालम नगरमध्ये घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शालम नगरात अन्सार शाह हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांच्या घरासमोर एक गोदाम असून तेथे रात्री उशीरापर्यंत सतत लोखंडी प्लेटा फेकून गोंधळ घातला जातो. याबाबत त्यांनी आधीही तक्रार दाखल केली होती दरम्यान, १ एप्रिलला गोदामामधील काहिंनी त्यांचा घरासमोर छोटा हत्ती ही चारचाकी गाडी लावली. या वेळी फिर्यादी अन्सार शाह यांचा भाऊ शाबीर शाह याने गाडी बाजूला लावण्यास सांगितले. या कारणावरून संतप्त झालेल्या गोदामातील ६ जणांनी शाबीर शाह यांच्यावर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केला. तर अन्सार शाह यांनी हस्तक्षेप केला असता त्यांच्यावरही लोखंडी सळईने वार करण्यात आले.
त्यानंतर दोघा भावांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जातिवाचक शिवीगाळ करत अन्सार शाह यांचा मोबाईल फोडून नुकसान केले. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या प्रकरणी अन्सार शाह यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार फारुक शेख मजीद शेख, रफिक शेख मजीद शेख, भुऱ्या शेख मजिद शेख, मजीद शेख गुफुर शेख, गफ्फार शेख करीम आणि उस्मान शेख नासीर या सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. संतोष पवार करत आहेत.
