जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
“चप्पल घेण्यासाठी जातो,” असे सांगून घराबाहेर पडलेला रामू हशा वास्कले (वय २९, रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगौन, मध्यप्रदेश; ह. मु. कुसुंबा, ता. जळगाव) याचा पाच दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह विमानतळाच्या मागे शेतात आढळून आला. ही घटना गुरुवारी (दि. ३१) सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, रामू वास्कले हे मूळचे मध्यप्रदेशातील असून, कुसुंबा येथे पत्नी आणि चार मुलांसह वास्तव्यास होते. ते गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून काम करत होते. दि. २६ जुलै रोजी, त्यांनी पत्नीला “मी चप्पल घ्यायला जातो” असे सांगून घर सोडले, मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली होती.
गुरुवारी, नशिराबाद परिसरातील आत्माराम राजाराम पाटील यांच्या शेतामागे काही तरुण रानभाजीसाठी गेले असताना त्यांना कुजलेला मृतदेह आढळून आला. ग्रामस्थ आणि पोलीस पाटील राधेशाम चौधरी घटनास्थळी पोहचले असता मृतदेहाची ओळख रामू वास्कले याच्याच रूपात झाली.
वैद्यकीय तपासणीत डोक्याला जखम असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रामूच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व दोन मुली असा परिवार असून, पंधरा महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.
