जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान रमी खेळल्याच्या प्रकरणात अडकलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा मिळालेला असला, तरी त्यांच्याकडील महत्वाचे कृषी खाते अखेर काढून घेण्यात आले आहे. हे खाते आता अजित पवारांच्या विश्वासू सहकारी आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक कल्याण खाते कोकाटेंकडे वर्ग करण्यात आले आहे, त्यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद सध्या वाचवण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कोकाटेंच्या खातेबदलावर शिक्कामोर्तब झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असल्याने ते अनुपस्थित होते. बैठकीनंतर रात्री उशिरा खातेबदलाचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले.
कोकाटेंचा अधिवेशनातील रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. भाजप सुरुवातीला त्यांच्या राजीनाम्यावर ठाम होता, परंतु शिंदे गटातील काही मंत्र्यांच्याही वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादीने संतुलित भूमिका घेत, कारवाई फक्त कोकाटेंवरच होऊ नये, असा दबाव टाकला. अखेर तडजोडीचा मार्ग म्हणून कोकाटेंचे खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, भरणे हे सुरुवातीपासूनच क्रीडा मंत्रालयावर नाराज होते. त्यांना महत्त्वाचे खाते मिळावे, अशी त्यांची मागणी होती. कृषिमंत्रिपद मिळाल्याने त्यांच्या नाराजीवर फुंकर घालण्यात आली आहे. “बारामती योग्य वेळी योग्य संधी देते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
याच दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही कृषिमंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र बीड जिल्ह्यातील वादग्रस्त सरपंच हत्याकांडामुळे त्यांचे पुनरागमन अडथळ्यात आले. राष्ट्रवादीकडून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंनी अधिवेशनात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी विधिमंडळाचा अहवालही तयार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी कोकाटेंचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
