
जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२५
जळगाव शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेचे आणि जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी दाखवून दिले आहे. एका महिलेची हरवलेली पर्स केवळ दीड तासात शोधून पीडित महिलेला परत दिली. ही घटना दुपारनंतर सायंकाळी 4.30 वाजता उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील शिवणी येथील सौ. निकीता गणेश बागुल (वय २१) या विवाहित आणि त्यांची बहीण वैशाली शंकर सोनवणे (रा. सावखेडा, ता. जळगाव) या सावखेडा येथून रिक्षाने टॉवर चौक, फुले मार्केट परिसरात आल्या. उतरताना त्यांनी रिक्षाच्या मागील सीटामागे पर्स विसरली. पर्समध्ये सोने-चांदीचे दागिने, 3000 रुपये रोख आणि दोघांचे मोबाईल होते.
तक्रार मिळताच ठाणे अंमलदार पोहेकों प्रकाश वाघ यांनी ही माहिती सपोनि सुरेश आव्हाड यांना दिली. आव्हाड यांनी तात्काळ पोहेकॉ विरेंद्र शिंदे, पोहेकॉ नंदलाल पाटील, पोहेकॉ भगवान पाटील यांना सरकारी वाहनासह शोधमोहीमेला रवाना केले. सायबर पोस्टेतील पोशि गौरव पाटील यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे पर्स शोधण्याचे काम सुरू केले. सुप्रीम कॉलनी, मेहरुण एमआयडीसी अशा ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर अजिंठा चौफुली येथे गॅस भरत असलेली रिक्षा मिळाली. त्यामध्ये हरवलेली पर्स आणि सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित अवस्थेत सापडल्या. पर्स मिळाल्यानंतर निकीता बागुल यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या म्हणाल्या, “मी मजुरी करते आणि माहेरी रक्षाबंधनासाठी आले होते. पर्स हरवली असती तर आर्थिक फटका बसला असता आणि सासरीही बोलणी खावी लागली असती. पोलिसांनी माझ्यासाठी रक्षाबंधन खास बनवले.”
ही कारवाई सपोनि सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विरेंद्र शिंदे, पोहेकॉ नंदलाल पाटील, पोहेकॉ भगवान पाटील आणि सायबर पोस्टेतील पोशि गौरव पाटील यांच्या कसून प्रयत्नांमुळे यशस्वी झाली.




















