जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५
चाळीसगाव येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेले आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. चाळीसगाव शहर पोलिसांनी विशेष कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून, चौथा आरोपी अद्याप फरार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि. २६ ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी आरोपी सोमा उर्फ सागर दगडु चौधरी, सनी उर्फ हरीष आबा पाटील, गौरव आधार चौधरी व नाना उर्फ शिवाजी सुरेश पाटील (सर्व रा. चाळीसगाव) अशी नावे समोर आली होती. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते.
गुप्त माहितीच्या आधारे ३० ऑगस्ट रोजी विराम गार्डजवळ नाकाबंदी करण्यात आली. यावेळी स्विफ्ट कार (क्र.एम.एच.०५ बीए ३१५३) मधून येणारे आरोपी सोमा चौधरी, सनी पाटील व गौरव चौधरी जेरबंद करण्यात आले. मात्र आरोपी नाना पाटील हा अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. योगेश माळी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि. शेखर डोमाळे व त्यांच्या पथकाचा सहभाग होता.