जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२५
राज्यातील मराठा आरक्षणासाठी नुकत्याच जारी केलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा संभ्रम काही घटक जाणीवपूर्वक पसरवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही, आणि फक्त निजामकालीन हैदराबाद गॅझेटमधील नोंदी असलेल्या खऱ्या कुणबींनाच या जीआरचा लाभ मिळेल, अशी स्पष्ट ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.
या जीआरबाबत निर्माण झालेल्या गैरसमजांना पूर्णविराम देत, त्यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. दरम्यान, ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत, त्यांच्या मनातील संभ्रम दूर केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा जीआर सरसकट मराठ्यांना आरक्षण देणारा नसून, केवळ ऐतिहासिक नोंदी असलेल्या कुणबी समाजापुरता मर्यादित आहे. “काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत. आम्ही फक्त गॅझेटमधील नोंदींनुसार प्रमाणपत्र देणार आहोत. ओबीसींवर कोणताही अन्याय होणार नाही,” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरवर सुरुवातीला नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. भुजबळ यांनी ओबीसी कोट्याला धक्का लागू नये, अशी भूमिका मांडली होती. यावर फडणवीस यांनी सांगितले की, भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर करण्यात आले आहेत. “भुजबळ नाराज नाहीत. आम्ही त्यांना विश्वासात घेतले आहे. ओबीसी समाजाला कोणताही धोका नाही,” असे फडणवीस यांनी नमूद केले.