जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२५
जिल्ह्यातील एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवत तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी ‘त्या’ विधवा महिलेवर जळगाव, धुळे, नाशिक येथे नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप आ.मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता. या प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज दि.५ रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आ. मंगेश चव्हाण यांनी सनसनाटी आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.संदीप पाटील यांच्यावर केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. डीपीडीसीत आरोप केल्यानंतर स्वतः आ. मंगेश चव्हाण यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी थेट पोलिस स्टेशन गाठले होते. फिर्याद देण्यासाठी आलेली महिला आपण नंतर येऊ असे सांगून परत गेली आणि आलीच नाही म्हणून गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र या विषयी नैतिकतेला सोडून कृत्य केल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांच्याकडे पाठविला होता. तसेच त्यांच दिवशी काही तासातच संदीप पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आय जी दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजी संदीप पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले. पाटील यांची अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत खाते अंतर्गत प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.
‘त्या’ बंधूंची चौकशी होणार का ?
आ.मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे प्रकरण उघड केले होते. या प्रकरणात पोलीस निरीक्षक पाटील यांना साथ देणारे दोन बंधूंचे नाव देखील यावेळी आ.चव्हाण यांनी घेतले होते. या प्रकरणात आता पोलीस निरीक्षक पाटील यांचे निलंबन झाले आहे तर ‘त्या’ दोन बंधूंची चौकशी होणार या कडे आता जळगाव जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.