जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२५
देशातील गुजरात राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागड टेकडीवर शनिवारी एका मालवाहू रोप-वेची केबल तुटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. या मालवाहू रोप-वेची केबल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तुटल्याने मोठा अपघात घडला.
या रोप-वेमधून मालवाहतूक होत होती. परंतु, या घटनेच्या वेळी त्यात सहा प्रवासी होते. रोप वे तुटल्यानंतर ते सर्वजण खाली कोसळले. या घटनेत दोन लिफ्ट ऑपरेटर, दोन मजूर आणि अन्य दोघांचा समावेश आहे. ज्या ठिकाणावरून रोप-वे खाली कोसळला, त्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे पंचमहालचे जिल्हाधिकारी अजय दहिया यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
पावागड येथील महाकालिका मंदिरासाठी ही टेकडी प्रसिद्ध आहे. मंदिर टेकडीच्या माथ्यावर असून, तेथे जाण्यासाठी दोन हजार पायर्या चढून जावे लागते किंवा मुख्य रोप-वेचा वापर केला जातो; पण गेल्या दोन दिवसांपासून खराब हवामानामुळे मुख्य रोप-वे सेवा बंद होती. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती, असे अधिकार्यांनी सांगितले.