जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२५
गणरायाची विसर्जन मिरवणुक पाहण्याकरीता असलेल्या कुटुंबियांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवारी दुपारी ४ ते रात्री दहा वाजेच्या सुमारास नारायण पार्क परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंट परिसरात दुचाकीवरून आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यावरुन पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नारायणी पार्क परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये रुचिता पवार या वास्तव्यास आहे. त्या कुटुंबियांसह शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्याकरीता शनिवारी दुपारी ४ वाजता घराल कुलूप लावून गावात आले. यावेळी त्यांचे घर बंद असल्याचे संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात हातसफाई केली. मिरवणुक बघून रात्री १० वाजता त्या घरी परतल्या असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. पवार यांनी घरात जावून पाहीले असता, त्यांना चोरटयांनी कपाट तोडून त्यातील सोन्याचे ५ तोळे वजनाचे दागिने चोरून नेल्याचे दिसून आले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसून आला.
घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर रुचिता पवार यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हेशाखेचे पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून रात्री शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.