जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२५
भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये सरकारविरोधी आंदोलनाने गंभीर वळण घेतले असून, देशातील तरुण पिढी — विशेषतः Gen Z — रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त करत आहे. भ्रष्टाचार, परिवारवाद आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेलं हे आंदोलन आता हिंसक बनलं आहे. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, काठमांडू शहरात लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.
आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी थेट संसद भवनाच्या कुंपणात घुसण्याचा प्रयत्न केला. हा भाग प्रतिबंधित झोन असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने लष्कराची मदत घेतली. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यू लागू केला असून, आता तो शहराच्या अनेक भागांमध्ये वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवासस्थानांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
आंदोलकांना तितक्या जोराने प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला, अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि काही ठिकाणी रबर बुलेट्सचा वापर केला. आंदोलकांनी झाडाच्या फांद्या, पाण्याच्या बाटल्या फेकून उत्तर दिलं. काही तरुणांनी “नेपोटिजम हटाव”, “भ्रष्टाचार बंद करा” अशा घोषणा देत संसदेच्या गेटवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.
हे आंदोलन उफाळून येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी घेतलेला निर्णय. सरकारने फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, ट्विटरसह एकूण २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. या कंपन्यांनी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी केली नसल्याचा दावा सरकारने केला. परंतु, तरुण वर्गाने या निर्णयाला लोकशाहीवर गदा आणणारा निर्णय मानत तीव्र विरोध दर्शवला आहे.
आज आंदोलनात सहभागी अनेक तरुणांच्या हातात “Stop Corruption”, “No to Nepotism”, “We are the Future”, अशा आशयाची फलकं दिसली. यावरून स्पष्ट होतं की, हे आंदोलन केवळ सोशल मीडियावरून उठलेलं नसून देशातील व्यवस्थेविरोधात तरुण पिढीचा संघर्ष सुरू आहे.