जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२५
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एलएलबी झालेल्या तरुण सलून व्यावसायिकाने राहत्या घरात टॉवेलने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता घडली. विजय सुरेश तायडे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. गळफास घेण्याआधी त्याने आईला फोन करून सांगितले होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
सविस्तर वृत्त असे कि, विजय येथील बसस्थानक परिसरात भावासोबत सलून व्यवसाय करत होता. त्याचे एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून, पत्नी मुलासह वेगळा राहत होता. सध्या पत्नी व लहान मुलासह माहेरी गेल्या असल्याने विजय घरी एकटाच होता. त्याने आईला फोन करून फाशी घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर आईने लगेच तिथेच खाली राहणाऱ्या लहान भावास कल्पना दिली.
आई-वडील व मोठा भाऊ तो राहात असलेल्या श्याम कॉलनीतील वरच्या खोलीत गेले असता कडी लावल्याने आतून बंद होती. दरवाजा तोडून सर्वजण आत गेल्यानंतर विजय गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले त्याआधीच रुग्णवाहिका आल्याने त्याला जीएमसीत दाखल केल्यानंतर तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, १ मुलगा असा परिवार आहे. विजयच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.