जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा अनेक कारणाने चर्चेत येत असतांना आता बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (34) यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमातील अबोल आणि वाद यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, गोविंद यांच्या मृत्यूनंतर ‘त्या नर्तिकेची खरी ओळख काय?’ हा प्रश्न स्थानिकांपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेत आहे. पूजा गायकवाड या नावामुळे आता या घटनेला अधिक वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवासी पूजा गायकवाड ही 21 वर्षांची आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी ती बार्शी तालुक्यातील थापडीतांडा येथील कला केंद्रात नृत्य सादर करू लागली. याच दरम्यान तिची ओळख गोविंद बर्गे यांच्याशी झाली. नंतर ती पारगाव कला केंद्राकडे वळली आणि या काळात तिच्या आणि गोविंद यांच्यातील ओळख हळूहळू प्रेमसंबंधात परिवर्तित झाली. नातेसंबंध दृढ करण्यासाठी गोविंद यांनी तिला महागडे मोबाईल, दागिने व इतर भेटवस्तू दिल्या. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, गोविंद यांनी पूजाला पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल दिला होता.
गोविंद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, पूजाने प्रेमसंबंध टिकवून ठेवत गोविंदकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले. तिने मिळालेल्या पैशांतून मावशी व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट खरेदी केला. एवढेच नव्हे, तर भावाच्या नावावर पाच एकर शेती करून द्यावी, तसेच गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर करावे, अशा मागण्या तिने केल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी तिने दिल्याचा आरोप आहे. या दबावामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या गोविंद यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले, असा संशय व्यक्त होत आहे.
पूजा गायकवाड ही सोशल मीडियावरही सक्रिय होती. इंस्टाग्रामवरून ती नियमित रील शेअर करत असे. विशेष म्हणजे, गोविंद यांनी आत्महत्या केलेल्या सोमवारी तिने तीन रील पोस्ट केल्या होत्या. मात्र त्यानंतर तिने एकही रील शेअर केलेली नाही. या योगायोगामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. गोविंद यांच्या आत्महत्येनंतर पूजावर गंभीर आरोप होत असले तरी तिच्या बाजूने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती असून, चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे तपशील उघड होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणानंतर केवळ बीडच नाही, तर संपूर्ण मराठवाड्यात ‘पूजा गायकवाड कोण होती?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे. तिच्या वयाच्या तुलनेत ती गोविंद यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तीच्या संपर्कात आली, प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर वाद व अबोला वाढल्यानंतर आत्महत्येसारखी घटना घडली. या घटनेमुळे कला केंद्रांमधील कार्यप्रणाली, तिथे काम करणाऱ्या कलाकारांचे जीवन, तसेच स्थानिक नेत्यांशी असलेले संबंध या सर्व बाबींवर नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गोविंद यांच्या कुटुंबीयांनी पूजावर केलेले गंभीर आरोप तपासात खरे ठरतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, एका तरुण नेत्याच्या आत्महत्येनंतर ‘पूजा गायकवाड’ हे नाव आता चर्चेचे केंद्र बनले आहे.