जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२५
भविष्यातील पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त पर्यावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर “नो पीयूसी, नो फ्युएल” (PUC नसल्यास इंधन नाही) या धोरणाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने इंधन भरणाऱ्या वाहनांचा क्रमांक स्कॅन करण्यात येणार असून, त्याद्वारे संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) वैध आहे की नाही, हे तपासले जाईल. वैध PUC नसलेल्या वाहनांना इंधन मिळणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी पेट्रोल पंपावरच तातडीने PUC प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी प्रमाणपत्राला एक युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (UID) दिला जाईल, ज्याद्वारे त्याची वैधता वेळोवेळी तपासता येणार आहे.
यापुढे वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि दुरुस्ती गॅरेजमध्येही PUC सर्टिफिकेट मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध PUC असणे बंधनकारक होणार आहे. सध्या बोगस PUC सर्टिफिकेट देणाऱ्या टोळ्यांवर लगाम घालण्यासाठी परिवहन विभागाने विशेष मोहिम राबवावी, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. हा निर्णय राबविला गेल्यास राज्यात प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.