जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२५
अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या 23 वर्षीय मयुरी ठोसरे हिने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व अश्लील छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील मोती नगर परिसरात घडली आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मयुरी ठोसरे यांचा विवाह 10 मे रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून पैशांच्या मागणीसाठी मानसिक छळ सुरु झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या छळामुळे मयुरीने अखेर 10 सप्टेंबर रोजी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, मयुरीचा वाढदिवस अवघ्या एका दिवस आधी – 9 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. हा कार्यक्रम तिच्या माहेरकडून खर्च करून आयोजित करण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी तिच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मयुरीच्या भावाने गंभीर आरोप करत सांगितले की, “माझ्या बहिणीचा दीर गणेश ठोसर याचा घटस्फोट झालेला असून, तो बहिणीसोबत वारंवार अश्लील वर्तन करत होता. बहिणीने याबाबत मला माहिती दिली होती, मात्र मी दुर्लक्ष केलं. त्याचे वर्तन अधिकच बिघडत गेले होते.” या घटनेनंतर मयुरीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. माहेरकडील नातेवाईकांनी सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही, असा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला.
पती गौरव ठोसर, दीर गणेश ठोसर, सासू लता ठोसर, किशोर ठोसर आणि ननंद यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयुरीच्या आई-वडिलांनी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, हुंडाबळीविरोधातील कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होते का? असा सवाल उपस्थित झाला आहे. यापूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर समाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मयुरी ठोसरे आत्महत्येने पुन्हा एकदा भयावह वास्तव उघड केले आहे.