जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५
गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेकांनी आयुष्य संपविल्याच्या घटना घडल्या होत्या आता लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड (वय 35) या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप पसरला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाज अधिक आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही आपल्याच महायुती सरकारवर टीका केली असून, सरकारने हा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असे म्हटले आहे. ही घटना आणि त्यानंतरची राजकीय प्रतिक्रिया, दोन्ही गोष्टी राज्यातील आरक्षण प्रश्नाची गंभीरता दर्शवतात.
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठीचा लढा तीव्र होत असतानाच, लातूर जिल्ह्यातील एका रिक्षाचालकाने आत्महत्या करून शासनाचे लक्ष वेधले आहे. भरत कराड नावाच्या या रिक्षाचालकाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून भरत कराड हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सक्रियपणे सहभागी होते. मराठा समाजाला ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करून कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी त्यांची भीती होती. याच चिंतेतून त्यांनी आपला जीव दिला, ज्यामुळे ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मांजरा नदीच्या पात्रात उडी घेण्यापूर्वी भरत कराड यांनी “ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे,” आणि “सरकार ओबीसीविरोधी आहे” अशा घोषणा दिल्या. काही तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भरत कराड यांनी म्हटले आहे की, “मी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी झालो होतो, तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून जीआर काढला. त्यामुळे मी जीवन संपवत आहे. माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
लातूर येथील भरत कराड यांच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे’ आणि ‘भरत कराड यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही’ अशा घोषणांनी वातावरण पूर्णपणे संतप्त झाले होते. भरत यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार असून, त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्याकडे केवळ 10 ते 20 गुंठे जमीन असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे ओबीसी समाजात शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र असंतोष आणि नाराजी पसरली आहे.