जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५
एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांभोरी शिवारात गालापुर रोडलगत फैजल शेख यांच्या शेतालगत काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती सपोनि. निलेश राजपूत यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. या पथकाने सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण १,६६,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गालापुर रोडच्या कडेला वाहने उभी करून, नाल्यालगत जमिनीवर बसून हे इसम पैशांवर पत्त्याचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेख फारुख शेख नबी (५०), शेख शहीद शेख रफिक (४०), शेख निजाम शेख सिराज (५२), तस्लीम सुलेमान खान (५७), शेख हमीद शेख शौकत (४३), शेख हमीद शेख अमीर (४०) आणि शेख मुस्ताक खान अमीर खान (६०) सर्व रा. कासोदा ता. एरंडोल जि. जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून ३,३८० रुपये रोख, २२,००० रुपये किमतीचे मोबाईल आणि १,४०,००० रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली असा एकूण १,६६,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोकॉ/१७१८ समाधान तोंडे यांच्या फिर्यादीवरून वरील सातही इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. निलेश राजपूत, पोना अकिल मुजावर, पोकॉ समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे व योगेश पाटील यांच्या पथकाने केली