जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२५
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाची मालिका सुरु असतांना आता भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील अयान कॉलनी येथे कौटुंबिक वाद चिघळून पतीने पत्नीच्या मामाचा खून केला, तर पत्नीच्या वडिलांवरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.
मयताचे नाव शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा. कंडारी, ता. भुसावळ) असे आहे. तर संबंधित महिलेचे वडील शेख जमील शेख शकर (वय ५२. रा. धुळे) हे जखमी आहेत. संशयित आरोपीचे नाव सुभान शेख भिकन कुरेशी (रा. अयान कॉलनी, भुसावळ) असे आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुभान शेख व पत्नी सईदा यांच्यात वाद सुरू होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी घर सोडून गेल्यानंतर कौटुंबिक तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री नातेवाइकांनी बैठक घेतली होती. यावेळी वाद चिघळून सुभान शेखने पत्नीचा मामा समद शेख याच्या छाती, मान, पोटावर चाकूने सपासप वार केले. तसेच सासरा शेख जमील यांच्यावरही वार केले. दोन्ही जखमींना तातडीने भुसावळ ग्रामीण रुग्णालय व पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी समद शेख यांना मृत घोषित केले. तर शेख जमील यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनीही पाहणी करून माहिती घेतली. पोलिसांनी आरोपी सुभान शेखला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. समद शेख हा हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुले व भाऊ असा परिवार आहे.