जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२५
चोपडा तालुक्यातील अडावद येथील जगदिश नगरातील रहिवासी आबा गोरख महाजन (वय ३६) या कर्जबाजारी शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून अती गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे कि, आबा महाजन यांनी १२ रोजी सकाळी राहत्या घरात औषधी गोळ्यांचे अती सेवन केले. त्यानंतर त्यांना त्रास सुरु झाल्याने त्यांना उपचारार्थ चोपडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी त्यांची उपजिल्हा रुग्णालयात रवानगी केली. चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी १ वाजेच्या सुमारास आबा महाजन यांची प्राणज्योत मालवली. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, आबा महाजन हे वर्डी शिवारात असलेली चार बिघे शेती कसत होते. या वर्षी त्यांनी मूग, उडिद, मका पिकांची लागवड केली होती. पाऊस कमी झाल्याने मुग, उडिदचे पीक आले नाही. त्यावर कांदे लावण्यासाठी बियाणे टाकून रोप तयार केले होते. परंतु, मागच्या आठवड्यात एक दिवस झालेल्या दमदार पावसाचा कांद्यांच्या रोपास फटका बसला. आधीच भारतीय स्टेट बँकेचे कर्ज होते. परत, कांदे लागवडीकरिता शेती तयार करण्यासाठी हात उसनवारी करून पैसे आणले होते. ते कसे फिटतील, याच विवंचनेतून त्यांनी गोळ्यांचे अती सेवन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मयत आबा महाजन यांच्या पश्चात पत्नी, १३ वर्षाचा मुलगा, १० वर्षाची मुलगी, वृद्ध आई व वडील असा परिवार आहे.