जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२५
शहरातील वाघनगर भागातील सुंदरमोती नगरात बुधवारी २३ वर्षीय मयुरी गौरव ठोसर या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचे वडिल भगवान बुडूकले यांनी गुरुवारी रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली, या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान बुडूकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत मयुरीच्या सासरच्या मंडळींकडून मेडीकल टाकण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ८ लाख दिले होते, उर्वरीत २ लाख रुपयांची पुन्हा मागणी केली, ही रक्कम न दिल्याने सासरच्या मंडळींनी मयुरीला वेळोवेळी शारिरीक व मानसीक त्रास दिला. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने, मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी मयत मयुरीचा पती गौरव ठोसर, दीर गणेश ठोसर, सासरे किशोर ठोसर व सासू लता ठोसर या चार जणांविरुद्ध मयुरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करत आहेत.