जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२५
धाराशिव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटिअरनुसार अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी एका युवकाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात घडली आहे. पवन गोपीचंद चव्हाण (वय ३२, रा. नाईकनगर, मुरूम) असे या युवकाचे नाव आहे.
पवन चव्हाण हा दोन दिवसांपूर्वी जिंतूर येथे बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनातून परतल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. शनिवारी सकाळी तो जिंतूरला जाण्याची तयारी करत होता. मात्र अचानक सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याने घरातील बांबूला गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना उघडकीस येताच चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृताच्या जवळ एक सुसाईड नोट आढळून आली. या चिठ्ठीत पवनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
पवन हा पदवीधर असून बेरोजगार होता. आपल्या समाजासाठी सतत झटणारा, जनजागृती करणारा आणि सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील असलेला युवक म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
पवनच्या आत्महत्येमुळे बंजारा समाजात शोककळा पसरली असून, समाजबांधवांमध्ये संतापाची भावना आहे. सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर या घटनेची तीव्र दखल घेण्यात येत आहे. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बंजारा समाजाच्या मागण्यांवर तातडीने विचार करावा, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.