जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२५
यावल तालुक्यातील आडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसुत झालेल्या पत्नीसाठी २९ वर्षीय तरुण हा चहा घेऊन जात होता. दरम्यान अचानक त्याला चक्कर आले आणि तो प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच कोसळला. त्यास स्थानिक डॉक्टरांनी तपासले व त्यास यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. ही घटना शनिवारी घडली, मृत तरूण मालोद येथील रहिवासी होता. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील आडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात पवन उर्फ पप्पू रमेश खंबायत (वय २९) मालोद ता. यावल या तरुणाच्या पत्नीस प्रसुतीसाठी दाखल केले होते. या विवाहितेला शुक्रवारी मुलगी झाली होती. तेव्हा शनिवारी पवन उर्फ पप्पू खंबायत हा पत्नीसाठी चहा घेऊन आरोग्य कें द्रात जात होता. दरम्यान आरोग्य कें द्राच्या आवारातच अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली डॉक्टरांनी तपासणी केली व त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी धनराज लिमये यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी तपास करीत आहेत.