जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५
“काही मोजक्या उद्योगपतींना कर्ज पुरवून देश ‘सुपर इकोनॉमिक पॉवर’ बनवता येणार नाही. त्याऐवजी, सामान्य जनतेला कर्ज पुरवठा करून देशाला खऱ्या अर्थाने आर्थिक महाशक्ती बनवण्याची वेळ आली आहे,” असे स्पष्ट आणि सडेतोड मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्यातील ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या ३१व्या वर्धापन दिन स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, “गरीबांना कर्ज दिलं की बुडतं, हा समज चुकीचा आहे. सहकारी संस्था आणि नागरी सहकारी बँका अत्यंत प्रामाणिकपणे कर्ज वितरण करत असून कर्जदार देखील ते प्रामाणिकपणे फेडतात. ही परंपरा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये दृढ आहे. सहकार चळवळीमुळेच देशाच्या जीडीपीमध्ये कृषी पतपुरवठा करणाऱ्या बँकांचे मोठे योगदान आहे.”
ते पुढे म्हणाले, “उत्तर भारतात ही चळवळ अद्याप रुजलेली नाही, त्यामुळे तेथील ग्रामीण विकास कमी आहे. स्थलांतर वाढत आहे. मात्र, लहान व्यावसायिक, दुग्ध उत्पादक, कृषी प्रक्रिया उद्योग यांना कर्ज मिळाल्यास तेथूनच आर्थिक क्रांती घडू शकते.”
गडकरींनी सहकार चळवळीचे कौतुक करत, तिच्या बळकटीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. “भविष्यात सहकार क्षेत्रात गुणवत्तापूर्ण नेतृत्व तयार होणे, संस्थांची पारदर्शकता व विश्वासार्हता यांच्यावर भर देणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.