जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२५
घरातून निघून गेलेली पत्नी विनवनी करुन देखील येत नसल्याने संतापलेल्या तरुणाने पोलीस ठाण्याच्या अवारात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. यामध्ये गंभीररित्या भाजला गेलेल्या सुनिल ममराज पवार (वय २५, रा. समता नगर) याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील समता नगरात सुनिल पवार हा आई, पत्नी यांच्यासह राहत होता. शहरातील एका हॉटेलमध्ये काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, सुनीलची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. पत्नी पुन्हा घरी परत यावी यासाठी सुनील पवार हा दि. ६ सप्टेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास त्याच्या मामा, मामी सोबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी सुनीलची मामी पोलिसांना घटनेची माहिती देत होती. तेवढ्यात मागून येत असलेल्या सुनिलला त्याच्या पत्नीचा फोन आला. फोनवर त्याने पत्नीला घरी येण्याकरीता विनवनी केली. परंतु दोघांच्या संवादामधून त्यांच्यातील वाद वाढतच गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनिलने दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोलची बॉटल काढून अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले हा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात उभे असलेले पोलीस कर्मचारी योगेश माळी यांच्या लक्षत आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पेटलेल्या सुनिलच्या दिशेने धाव घेत अंगातील शर्ट काढून त्याला विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्यामुळे सुनिल पवार हा ६० ते ६५ टक्के भाजला गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. आठ दिवसांपासून सुनिलची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर रविवारी सायंकाळच्या सुमारास अपयशी ठरली.
या दुर्देवी घटनेमुळे सुनील पवार यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच समता नगर परिसरात देखील शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.