जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२५
वाद्याच्या तालावर भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा ठसा उमटविणारे शिवतांडव प्रतिष्ठान वाद्य पथक हे गेल्या नऊ वर्षांपासून जळगावकरांच्या हृदयात घर करून आहे. स्थानिकच नव्हे तर आता राष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमठवत, या पथकाने यंदा ऐतिहासिक कामगिरी करत भाग्यनगर हैदराबादमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत भव्य सादरीकरण केले. विशेष म्हणजे, श्री भाग्यलक्ष्मी मंदिराजवळ वादन करणारे हे महाराष्ट्रातील पहिले वाद्यपथक ठरले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात ढोल-ताशांच्या निनादाने जळगावकरांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या पथकाने यंदा ३ ते ७ सप्टेंबरदरम्यान हैदराबादमध्ये आपले वादनकौशल्य सादर केले. ४ सप्टेंबरला भाग्यनगरातील आमदारांच्या उपस्थितीत पहिले सादरीकरण झाले, तर ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री सदन येथे भव्य वादन करत राजकीय व सामाजिक मान्यवरांचे लक्ष वेधले. ६ सप्टेंबर रोजी कबुतरखान्यातून निघालेल्या वादन मिरवणुकीतून चारमिनार परिसरातील श्री भाग्यलक्ष्मी मंदिराजवळ या पथकाने थरारक सादरीकरण करत हजारोंच्या उपस्थितीत आपली छाप सोडली.
१२८ वादकांची ताकद लाभलेल्या या पथकात सध्या १०४ मुले व २४ मुली कार्यरत असून, शिस्त, समर्पण आणि तालावरील अचूक पकड यामुळे ‘शिवतांडव’ची ओळख आगळीवेगळी ठरते. त्यांच्या या भव्य सादरीकरणामुळे जळगावच्या सांस्कृतिक परंपरेचा डंका आता मराठवाड्यापलिकडेही वाजू लागला आहे.
या यशानंतर हैदराबादमधून गणपती व देवी विसर्जन मिरवणुकांसाठी निमंत्रणे येऊ लागल्याचे पथकातील वादकांनी आनंदाने सांगितले. आगामी वर्षात नवीन वादकांना संधी देत पथक आणखी भव्य करण्याचा आयोजकांचा मनोदय असून, ‘शिवतांडव’ हे नाव आगामी काळात संपूर्ण देशात गाजेल, याची जळगावकरांना खात्री आहे.