जळगाव मिरर । १७ सप्टेंबर २०२५
कामावरुन घरी जाणाऱ्या सायकल स्वाराला विरुद्ध दिशेने येणाऱ्या येणाऱ्या स्कुल व्हॅनने जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वार वसंत प्रताप पाटील (वय ७०, रा. खंडेराव नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास इच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील खंडेराव नगरात राहणारे वसंत पाटील हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ड्युटी आटोपून ते सकाळच्या सुमारास सायकलने घरी परत जात होते. यावेळी इच्छादेवी चौकात समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीवाय १८६१) क्रमांकाच्या स्कुल बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात वसंत पाटील रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ जखमी वसंत पाटील यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, वसंत पाटील यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.