जळगाव मिरर । १८ सप्टेंबर २०२५
अंगणात खेळणाऱ्या श्रावणी मोहन बागुल (वय ९, रा. मोहाडी, ता. जळगाव) या मुलीच्या पायाच्या पंज्यात अडकलेली पिस्तुलची गोळी सात महिन्यांनंतर शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. ही घटना उघडकीस येताच पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी केली जात आहे. मात्र दुसरीकडे याच परिसरात पोलिस विभागाचे फायरिंग रेंज (गोळीबार टेकडी) असून तेथे पोलिस गोळीबाराचा सराव करतांना ती गोळी मुलीला लागल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि , जळगाव तालुक्यातील मोहाडी गावाजवळ मोहन बागुल हे वास्तव्यास आहे, त्यांचे नऊ वर्षाची मुलगी श्रावणी ही मैत्रीणींसह अंगणात खेळत होती. यावेळी अचानक तिच्या पायाला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव होत असल्याने तीला तात्काळ मोहाडी येथील रुग्णालयात नेले. परंतू मुलीच्या पायाला असलेली जखम मोठी आणि रक्तस्त्राव थांबत तीला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलीच्या पायाच्या जखमेवर टाके मारुन तीला औषधी देवून घरी पाठवून दिल्याचा गंभीर प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे. तसेच डॉक्टरांकडून घोरपड किंवा अन्य प्राण्याने चावा घेतल्याच्या संशयावरुन श्रावणीवर सात महिन्यांपासून उपचार केले जात होते.
याठिकाणावरील डॉक्टरांनी त्या मुलीची चौकशी करुन आवश्यक उपचार केल असते, तर या घटनेचा त्याचवेळी उलगडा होवून मुलीला होणारा त्रास हा टळला असता. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात सुरु असलेला भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात पिस्तुलाची गोळी आढळून आल्याचे समजाताच पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस येताच जिल्हापेठ पोलिसांकडून श्रावणी व तिच्या कुटुंबियांची चौकशी करुन ती गोळी जप्त करण्यात आली. त्यानंतर ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे एमआयडीसी पोलीसांकडून बुधवारी सायंकाळी या प्रकरणाची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
श्रावणीच्या पायात पिस्तुलच्या गोळी सारखे काहीतरी असल्याचे निदान होताच, तीला भास्कर मार्केट परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी डॉ. विरेन पाटील यांनी श्रावणीची तपासणी करीत तिच्या पायाची शस्त्रक्रिया करुन पायाच्या पंज्याजवळ अकडलेली पिस्तुलाची गोळी बाहेर काढण्यात आली. ही गोळी जिल्हापेठ पोलीसांनी जप्त केली असून त्यानुसार देखील चौकशी केली जात आहे. काही दिवसांपासून श्रावणीचा पाय दुखत असून तीची बोटे देखील काळू पडू लागल्याने मुलीच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी श्रावणीच्या पंज्याला गाठ असल्यामुळे डॉक्टरांनी त्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु त्याचे योग्य पद्धतीने निदान न झाल्याने त्यांनी पायाचा एक्सरे काढला, त्यामध्ये पायात तिस्तुलच्या गोळीसारखे काही तरी असल्याचे निदान झाले.