जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२५
भुसावळ शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन बँच (डी.बी.) पथकाने कसोसीने केलेल्या तपासामुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. या दुचाकी चोरी प्रकरणात ३ दुचाकींसह बऱ्हाणपूर येथील एकाला जेरबंद करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, या संदर्भात भुसावळातील पांडुरंगनाथ नगरमधील सुनील पांडुरंग इंगळे यांनी त्यांची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच- १९, ईडी- ७६५०) चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. ही तक्रार दिल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुचाकीच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित आरोपी हा मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे आहे. त्यानुसार डी.बी. पथकाने कारवाई करत मध्य प्रदेशातील बाणूर येथील अरशद खान अहमद खान (वय २२, रा. खाजा नगर, आझाद नगर) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती आरोपीने आपल्या एका विधीसंघर्षित साथीदारासोबत मिळून भुसावळ परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यात १ लाख २५ हजारांची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच- १९, ईडी- ७६५०), ५० हजारांची बजाज प्लॅटिना (एमएच-१९, डीएस- ३७२२) व ५० हजारांची बजाज सी.टी. १०० ही विना क्रमांकाची गाडी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या कारवाईतून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले २ गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीस गेलेल्या २ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या यशस्वी ऑपरेशनमध्ये डी.बी. पथकाचे स.पो.नि. नितीन पाटील, उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, किरण धनगर, रवींद्र भावसार, सुनील सोनवणे, सचिन चौधरी, हर्षल महाजन, जिवन कापडे, महेंद्र पाटील, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अढाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी, योगेश महाजन यांचा सहभाग होता. तपास पो.हे.कॉ. विजय नेरकर करत आहेत.