जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२५
भुसावळ शहरातील शिवाजीनगर परिसरातील डी. एल. हिंदी हायस्कूलच्या मैदानावर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून तीन तरुणांनी चौघांना बेदम मारहाण करत चाकूहल्ला केला. या घटनेत चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, आदिल खान मुकीम खान, शेख साहिल शेख सईद कुरेशी, भावेश शशिकांत बहिरुणे आणि प्रणय गणेश निहारे हे मैदानावर असताना साहिल ढोल्या (पूर्ण नाव माहिती नाही), जावेद शेख ऊर्फ जावेद पटेल आणि सोहेल कुरेशी हे तिथे आले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन तिघांनी चौघांना मारहाण सुरू केली. यावेळी साहिल ढोल्या याने जवळील चाकूने वार करत चौघांना जखमी केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जखमी तरुणांनी थेट भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी तातडीने पथक घटनास्थळी रवाना केले. विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित व प्रभारी पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोहेका विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, जावेद शहा, भूषण चौधरी, योगेश माळी, अमर आढाळे व प्रशांत सोनार या पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबवून आदिल खान व सोहेल कुरेशी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, जावेद शेख ऊर्फ जावेद पटेल याचा शोध सुरू आहे. आदिल खान मुकीम खान यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार सोहेल कुरेशीने इतर तरुणांना बोलावून घडवून आणल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. भांडणाचे नेमके कारण मात्र तपासातूनच स्पष्ट होणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील पुढील तपास करीत आहेत.