जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२५
राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरूवारी गँगस्टर नीलेश घायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना देऊन अडचणीत सापडलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांना मोठे करणारे व डान्सबार असणारे मंत्री महाराष्ट्राने का सहन करावेत? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गँगस्टर गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. योगेश कदम यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना देणे हे कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारे आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हेगाराला बळ दिले. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अंजली दमानिया या प्रकरणी म्हणाल्या की, गृहराज्य मंत्री योगेश कदम. मी एक सामान्य नागरीक म्हणून तुमच्या राजीनाम्याची मागणी करते. गुन्हेगारांना मोठे करणारे आणि डान्सबार असणारे मंत्री महाराष्ट्राने का सहन करावेत? पोलिस आयुक्तांचा अहवाल/शिफारस अत्यंत महत्त्वाची असते. जर परवाना या टप्प्यावर नाकारला गेला असेल तर त्यामागे साधारणपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असते.
पण आपण पोलिसांच्या नकारानंतर परवाना कसा, आणि का मंजूर केला? एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तुम्ही का दिलात? पोलिसांचा निर्णय तुम्ही का बदलला? याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. कारण हा कायद्याचा अपमान आहे. सार्वजनिक सुरक्षेची ऐशीतैशी करणारे तुम्ही कोण? असा खडा सवाल दमानिया यांनी यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या प्रकरणी योगेश कदम यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पुणे पोलिसांनी सचिन गायवळ (घायवळ) यांचा बंदूक परवाना नाकारला. हा नीलेश गायवळचा भाऊ, जो बनावट पासपोर्टवर भारतातून पळाला, LOC असतानाही! पण महाराष्ट्र गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डकडे दुर्लक्ष करून परवाना मंजूर केला! आर्म्स अॅक्टनुसार सर्व परवाने NDAL-ALIS (https://ndal-alis.gov.in) वर सार्वजनिक असले पाहिजेत. परंतु ते का टाळलं जातंय? कुणाला पाठीशी घातलं जातंय, असे विविध सवाल कुंभार यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. त्यांनी आपले ट्विट महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलिसांना टॅग करत त्यांना गुंडगिरी थांबवण्याचेही आवाहन केले आहे.




















