जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२५
राज्यात सध्या आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असल्याचे दिसत आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आज ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली असून ठाणे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करत लवकरच वाहतूक कोंडीच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही दोन पक्ष असलो तरी जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत हेही दिसतील. आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज आहोत, असे म्हणत अविनाश जाधव यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
अविनाश जाधव म्हणाले, ठाण्यात दहशतीचे वातावरण असून दहशतीला घाबरून अनेकजण तिकडे आहेत, आम्ही एकत्रपणे लढू, आम्ही घाबरणार नाही, ठाणेकरांसाठी आम्ही लढणार, असे म्हणत जाधव यांनी मनसे शिवसेना युतीचे थेट संकेत दिले आहेत. तसेच 4 हजार कोटींच्या महापालिकेला या लोकांनी बरबाद केले, या लोकांनी पालिका लुटून खाल्ली. ज्यावेळी आमची सत्ता येईल, तेव्हा सर्वांची चौकशी लाऊन यांना आत टाकू, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, घोडबंदरला काही अधिकारी पाणी विकतात, ठाण्यात वाहतूक कोंडीला कंटाळून लोक रस्त्यावर उतरले. आता, गडकरी रंगायतन ते ठाणे पालिका असा मोर्चा निघेल, यापुढे असे अनेक मोर्चे निघतील, ठाणेकरांसाठी असे अनेक मोर्चे काढले जातील, असे जाधव यांनी सांगितले आहे. तसेच आजच्या पत्रकार परिषदेत आम्ही दोन पक्ष असलो तरी आमदार जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण हेही दिसतील, अशी माहिती जाधव यांनी दिली आहे. आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज आहोत, इथे पैसा टिकणार नाही, असा इशारा शिंदे गटाला दिला आहे.




















