जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५
देशाला हादरवून टाकणारी संतापजनक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे केवळ पीडित मुलगीच नव्हे, तर तिचे संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. ही भीषण घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ओडिशामधील असून ती दुर्गापूरमधील एका नामांकित खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकते. त्या रात्री ती आपल्या मित्रासोबत जेवायला बाहेर गेली होती. परंतु, तिच्या आयुष्यातील हा सामान्य क्षण एका दुःस्वप्नात बदलला. कॅम्पसच्या मुख्य गेटजवळ उभ्या असलेल्या तीन तरुणांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि केसांना धरून तिला जबरदस्तीने कॅम्पसशेजारील जंगलात ओढून नेले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तिचा मित्र या सगळ्या प्रसंगात तिला मदत न करता पळून गेला आणि पोलिसांना माहिती दिली. त्या जंगलात तिघांनी तिच्यावर अमानुष बलात्कार केला. यावेळी आरोपींनी तिला धमकी दिली की, जर तिने कुणाला काही सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. इतकंच नव्हे, तर तिचा मोबाईल परत देण्यासाठी त्यांनी पैसेही मागितले.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यास सुरुवात केली आहे. दुर्गापूर न्यू टाउनशिप पोलिस ठाण्यात पीडितेच्या पालकांनी ११ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली.
पीडित मुलीचे वडील म्हणाले, “मी हे कॉलेज सुरक्षित आणि चांगले असल्याचे समजून मुलीला येथे शिकण्यासाठी पाठवले होते. मला वाटलेही नव्हते की तिच्या आयुष्यात असा काळा दिवस येईल. येथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही.” पीडितेच्या आईने तातडीने रुग्णालयात धाव घेतली असून, सध्या पीडित मुलगी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रकरणात पीडितेच्या पालकांनी तिच्या मित्रावरही संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या मित्रांचीही चौकशी सुरू आहे. दुर्गापूरच्या एसडीओ रंजना रॉय यांनी पीडितेला भेट दिली असून त्यांनी आश्वासन दिले आहे की, आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल.