जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२५
राज्यातील मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आता माजी मंत्री बच्चू कडू संतापले असून त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशांचे सोंग जमत नाही. पैशांचे सोंग जमात नसेल तर खुर्ची सोडा, असे म्हणत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बच्चू कडू यांनी अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, सकाळी 7 वाजता उठून तुम्ही शपथ घेतली. एवढे सोंग कोणाला जमले का दादा, कुठे गेली तुमची दादागिरी? वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशांचे सोंग जमत नाही. जमत नसेल तर आम्हाला सांगा! मी सांगतो कसे सोंग करायचे. शक्तिपीठ महामार्गासाठी 85 हजार कोटी तुमच्या निधीतून दिले. आम्ही रस्त्यातील खड्ड्याने मरतोय. दादा हे सोंग कसे जमले तुम्हाला? कोणाच्या खिशातून पैसा काढला तुम्ही? किती लुटले ते आम्हाला सांगा. माझा शेतकरी पाय घासून मरतोय त्यासाठी पैसा नाही. तिथे तुम्हाला पैशांचे सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा, अशी टीका कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना अजित पवारांचे मागील काही वादग्रस्त वक्तव्यांचा दाखला देत टीका केली. मागे एकदा अजित पवार म्हणाले होते पाणी नाही तर, धरणात xxx का? या विधानावर भाष्य करत टीका करताना बच्चू कडू म्हणाले, खरोखरच xxx तर वाहत जाईल दादा, सापडणार ही नाहीत कोणत्या नदीत गेले, समुद्रात गेले, डोहात गेले तर, असे म्हणत कडू यांनी पवारांवर जहरी टीका केली.
पुढे बोलताना बच्चू कडू यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कृषिमंत्री शेतकऱ्यांसाठी भांडताना दिसला पाहिजे. नुसता शेपूट हलवणारा नकोय आम्हाला. मागे माणिकराव कोकाटे कृषिमंत्री होते. ते ओबडधोबड बोलत होते. ते घरी गेले. भरणे थोडे बरे बोलतात, कमीत कमी ते चुका तरी करत नाहीत. मात्र, शेपूट हलवणे बंद केले पाहिजे, अशी खोचक टीका कडू यांनी केली आहे. तुम्ही कृषिमंत्री आहात.. सबसे ज्यादा ‘भार तुम्हारी तरफ’ है… सर्वात जास्त संख्या शेतकऱ्यांची आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.