जळगाव मिरर | १५ ओक्टोबर २०२५
ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे संचलित ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह या संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचा भव्य सोहळा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा, पुणे येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या मानाच्या पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व माहिती अधिकार क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय कार्यरत असलेले कार्यकर्ते अमोल अशोक कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले. जनहितार्थ त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेत, पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी तथा माहिती अधिकार नोडल अधिकारी श्री. नितीन केंजळे यांच्या हस्ते कोल्हे यांना शाल, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर व प्रा. नामदेवराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून माहिती अधिकार चळवळीचे महत्त्व व नागरिकांच्या सहभागाची गरज अधोरेखित केली.
पुरस्कार स्वीकृतीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना अमोल कोल्हे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या कार्याला अधिक प्रेरणा देणारा ठरेल. या सन्मानामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजहित, सामाजिक परिवर्तन आणि जनजागृतीसाठी माझा लढा आगामी काळात अधिक जोमाने सुरू राहील.”
तसेच, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना गौरवून प्रोत्साहन दिल्याबद्दल कोल्हे यांनी ज्ञानमाता सेवाभावी संस्था व अध्यक्ष अब्राहम आढाव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
अधिवेशनात राज्यभरातील अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. विविध जिल्ह्यांतील पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारविरोधी मोहिमा आणि नागरिक जनजागृतीबाबतच्या यशस्वी उपक्रमांचे अनुभव शेअर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या अधिवेशनातून राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, माहिती अधिकार चळवळ अधिक प्रभावी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.