जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि वरणगाव शिवारातील तीन पेट्रोल पंपांवर गेल्या आठवड्यात शस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. विशेष म्हणजे, मुक्ताईनगर येथील हा पेट्रोल पंप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा असल्याने, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. या सशस्त्र दरोड्याप्रकरणी जळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले असून, त्यांनी आता सहा जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्यांचाही समावेश आहे.
दिनांक 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्युअल, कर्की फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि वरणगावजवळील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंप अशा तीन ठिकाणी बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला होता. आरोपींनी रोख रकमेसह मोबाईल आणि सीसीटीव्हीचे डीव्हीआरही चोरून नेले होते. या तिन्ही घटनांमधून चोरट्यांनी 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने एक विशेष तपास पथक तयार केले आणि तपास सुरू केला.
पोलिस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर तपास करत नाशिक आणि अकोला येथे छापे टाकले आणि या दरोडेखोरांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल व देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. सध्या सर्व आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस या टोळीच्या इतर गुन्ह्यांचा आणि पुढील कटाचा कसून तपास करत आहेत. या कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांना जरब बसेल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.